दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्कासाठी विविध पर्यायी उपाययोजना कराव्यात- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : दूरध्वनी, इंटरनेट संपर्कव्यवस्था नसलेल्या दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएलसह अन्य खासगी दूरसंचार सेवा पुरवठादारांनी स्थळपाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दुर्गम भागातील मतदान केंद्रांवरील संपर्क व्यवस्था नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, संपर्क आराखडाविषयक समन्वयक अधिकारी शमा ढोक-पवार, खेड उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक युवराज मोहिते आदी उपस्थित होते.

या निवडणुकीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भारत निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त भर दिला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, मतदान केंद्राध्यक्षाला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना विविध माहिती भरण्यासाठी ॲप, निवडणूक प्रकियेतील गैरप्रकारांची तक्रार, माहिती देण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेले ‘सी- व्हिजील’ आदी ॲप आदी विविध मोबाईल उपयोजक (ॲप्स) उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने संपर्क व्यवस्था सुव्यवस्थित असल्यास मिळालेल्या माहितीवर तात्काळ प्रतिसाद देणे, कार्यवाही करणे शक्य होईल.

Advertisement

डॉ. दिवसे पुढे म्हणाले, बीएसएनएल सह अन्य सेवा पुरवठादारांनी जवळची दूरसंचार व्यवस्था, टॉवर्सची क्षमता तांत्रिक उपाययोजनांच्या सहाय्याने ४ जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवण्याबाबत चाचपणी करावी, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्याला १० सॅटेलाईट फोन देण्यात आले असून तेही कार्यान्वित करुन तेवढी मतदान केंद्रे संपर्क व्यवस्थेत समाविष्ट करता येतील. याशिवाय जिल्ह्यात खासगी हॅम रेडिओ ऑपरेटर्स असून त्यांचीही मदत याकामी घ्यावी. तसेच वॉकी- टॉकी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतानाच संदेशवाहक (रायडर्स) नेमून संपर्क व्यवस्था उत्कृष्टपणे राबवावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

पुणे जिल्ह्यात खेड, भोर, वेल्हे, मुळशी, जुन्नर या तालुक्यात एकूण ४६ शॅडो भाग आहेत, असे बैठकीत सांगण्यात आले. या भागात पर्यायी संपर्क व्यवस्था तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस अधिकारी, बीएसएनएल सह अन्य सेवा पुरवठादारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page