विनापरवाना जनावरांची वाहतूकी प्रकरणी तब्बल ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सासवड : विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी तब्बल ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पकडुन दोघां विरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १७ फेब्रुवारी) रोजी खळद फाटा(ता.पुरंदर जि.पुणे) येथे करण्यात आली. यासीन हुस्मान शेख आणि सोहेल यासीन शेख (दोघेही रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रुषिकेश रामचंद्र कामथे(वय २७ वर्षे, रा.महादेवनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन आणि सोहेल हे त्यांच्या ताब्यातील अशोक लेलंड कंपनीच्या ट्रक(एम.एच.११ बी.डी.५०००) मधून विनापरवाना जनावरे घेऊन त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था न करता दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी जेजुरीकडुन सासवड दिशेने चालले होते. फिर्यादी रुषिकेश कामथे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी व त्यांचे साथीदार अनिरुद्ध अनिल लष्करे(रा. येरवडा, पुणे) राहुल सुभाष कदम(रा.सुखसागर नगर,कोंढवा, पुणे), प्रतिक विलास कांचन(रा. उरुळी कांचन, ता. हवेली), प्रकाश बाळकृष्ण खोले (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी पाठलाग करून हा ट्रक खळद फाटा(ता.पुरंदर जि.पुणे) येथे पकडुन सासवड पोलिसांच्या स्वाधीन केला. यामध्ये अंदाजे १ ते ४ वय असलेले लहान मोठे एकुण १६ म्हैसवर्गीय जातीचे ८० हजार रुपये किंमतीचे रेडे होते. सासवड पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीचा ट्रक आणि ८० हजार रुपये किंमतीचे जनावरे असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून ट्रक चालक यासीन शेख आणि क्लिनर सोहेल शेख यांच्यावर प्राण्यांचा छळप्रतिबंध कायदा, महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार लडकत करीत आहेत.