लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोरमधील पहिले प्रशिक्षण संपन्न; आयोगाच्या निर्देशाचे पालन काटेकोरपणे करण्याचे राजेंद्र कचरे यांचे आवाहन
भोर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण भोर-महाड रोडवरील अभिजीत मंगल कार्यालय, भोर येथे आज रविवारी(दि. ७ एप्रिल) पार पडले. सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेले भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी हे प्रशिक्षण दिले. यावेळी भोरचे तहसीलदार सचिन पाटील आणि नायब तहसिलदार अरुण कदम उपस्थित होते.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात निवडणुकीसाठी २४० मतदान केंद्रावर मतदान होणार असून याकरिता १४४० कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी भोर तहसिल कार्यालयाने तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्रावर मतदानादिवशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लाईव्ह रेकॉर्डिंग केले जाणार आहे. या मतदान केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य शासकीय गाडीनेच योग्यरीत्या न्यावे लागणार आहे. यासाठी कोणतीही खाजगी गाडी वापरायची नसून मतदान केंद्रावर पुरुष कर्मचाऱ्यांना आदल्या दिवशी जावेच लागणार आहे, महिला कर्मचाऱ्यांना मात्र मतदानादिवशी सकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावर हजर रहावे लागणार आहे.
त्यानंतर सकाळी ५.४५ मिनिटांनी मॉक पोल (मतदान यंत्राची चाचणी) उमेदवारांच्या पोलींग एजंट किंवा त्यावेळे पर्यंत ते हजर नसतील तर त्यांच्याविना घ्यावाच लागणार आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला किमान १ मत ते जास्तीत जास्त एकूण ५० मतांपर्यंत हा पोल घेऊन मतदान यंत्राची चाचणी होणार आहे.
मतदान यंत्र कसे जोडावे, कसे हाताळावे याबद्दल परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण यावेळी एलईडी स्क्रीनवर देण्यात आले. तसेच मतदान केंद्रावरील नेमून दिलेल्या जबाबदारीचे पालन, कर्तव्ये, अधिकार याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन किंवा तत्सम परिस्थिती उद्भवली असता काय करावे, हेही यावेळी सांगण्यात आले. विशेषतः मतदान केंद्रात कोणालाच मोबाईल नेऊन देण्यात येणार नाही व पोलींग एजंटला देखील त्याच्याजवळ असलेली मतदान नोंद झाल्याची यादी मतदान केंद्राच्या बाहेर नेता येणार नाही, हे राजेंद्र कचरे यांनी आवर्जून सांगितले. या प्रशिक्षणात जवळपास एक हजारच्या आसपास प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले. सकाळ व दुपार अशा एकूण दोन सत्रात प्रशिक्षण पार पडले.
यावेळी ब्रेल लिपीतील आकडे बटणाशेजारी
यावेळी अंध बांधवांसाठी मतदान यंत्रावर विशेष सोय केली आहे. मतदान यंत्रावरील बटणाशेजारी ब्रेल लिपीतील आकडे दिले असून त्यामुळे अंध बांधवांना कोणाच्याही सहाय्याशिवाय मतदान करता येणार आहे.