वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळत गरजू विद्यार्थ्यांना मदत; सागर सोंडकर यांचा स्तुत्य उपक्रम
भोर : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाचा अनाठाई खर्च करून आनंद साजरा करत तो सर्वांच्या समोर व्यक्त करणे ही एक तरुणाची फॅशन बनली आहे. हा अनावश्यक खर्च टाळून ‘आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो’ या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत भोर तालुक्यातील केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर सोंडकर व परिवारांनी या गोष्टीला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांना फळांचे, धान्याचे व शैक्षणिक साहित्या सोबत क्रीडा साहित्याची वाटप केले.
सोंडकर यांनी शुभ दिवसाची सुरुवात करत प्रथमतः भोर एज्युकेशन सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले. त्यांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित वनवासी कल्याण आश्रम येथील मुलांना गहू ज्वारी व कडधान्य असलेल्या पोत्यांचे वाटप केले. तसेच भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील दुर्गम भागात असणाऱ्या आपटी गावातील अध्यात्मिक ज्ञानमंत्र शिक्षण संस्थेतील मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बुद्धिबळाचे साहित्य , कॅरम , फुटबॉल , हॉलीबॉल , बॅडमिंटन , फुल बॅट , दोरीच्या उड्याचा संच, क्रिकेट खेळण्याचे साहित्याचा संच देण्यात आला.
यावेळी विचार व्यक्त करताना सागर सोंडकर म्हणाले की, लहान वयात मुलांनी अभ्यास वृत्ती धारण करून आपल्या स्वराज्य भूमीसाठी व परिसरातील भागातील लोकांसाठी सामाजिक बांधिलकी जपून काम केले पाहिजे. आपल्या परिसरात छत्रपतीं शिवाजी महाराजांनी स्वराज्यभूमी उभी करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करून इतिहास घडवला तसाच इतिहास आपण घडवण्यासाठी आत्तापासूनच कार्य केले पाहिजे असे आवाहन सोंडकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. राहुल महाराज पारठे, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद जाधव, वनवासी कल्याण आश्रमाचे व्यवस्थापक दिलीप लांगे, फायटर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष सुरज आवाळे, सुरेश ऍग्रो इंडस्ट्रीज मालक व प्रसिद्ध उद्योजक विनोद बोडके, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, निस्वार्थ सेवा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन भोसले आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पारठे यांनी केले तर अमित पारठे यांनी आभार मानले.