बाजार समित्यांवर कायमस्वरूपी प्रशासक नेमण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ पुणे-सातारा जिल्ह्यातील बाजार समित्या बंद
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे-सातारा जिल्ह्यातील बाजार समित्या आज सोमवारी(दि.२६ फेब्रुवारी) बंद होत्या. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उलाढाल ठप्प झाली.
पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी साेमवारी मार्केटयार्ड मधील फळबाजार, पालेभाज्या बाजार बंद पाळला. याबंदमुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. बंदमध्ये विविध कामगार संघटना सहभागी झाल्याने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
तसेच सातारा जिल्ह्यातील एकूण चार मोठ्या अशा असलेल्या सातारा, कराड, वाई आणि फलटण या बाजार समितीत दररोज लाखो रुपयांची शेत मालाच्या माध्यमातून उलाढाल होते. परंतु आज सोमवारच्या एक दिवसाच्या बंदमुळे बाजार समितीतीतील शेतमाल खरेदी विक्री हि बंद राहिली. आडत व्यापारीही बंद मध्ये सहभागी झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. व्यापाऱ्यांचे गाळेही बंद होते.
बाजार समिती आज बंद ठेवण्यात येणार असल्याचे माहिती असल्याने या बंदमुळे शेतकरीही बाजार समितीकडे फिरकले नाहीत. यामुळे पुणे-सातारा बाजार समितीची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणावर थांबली. तर शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.