पुणे जिल्ह्यात भात पट्ट्यात ३,२४० हेक्टरवर रोपवाटिका तयार; जिल्ह्यातील भात रोपवाटिकेचे तालुकानिहाय क्षेत्र सविस्तर जाणून घ्या
भोर : गेल्या आठ दिवसांपासून जोरदर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. भात पट्ट्यात आत्तापर्यंत ३,२४० हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या असून, येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास रोपवाटिका करण्यासाठी आणखी वेग येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत .
पुणे जिल्ह्यात खरिपाची एक लाख ९५ हजार ७१० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी भाताची ६० हजार २०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात.
यंदा कमी-अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठाचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना केला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रातून निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहे. पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे.
त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिका यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू झाली आहेत. पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यातील भात रोपवाटिकेचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका — रोपवाटिकेचे क्षेत्र
भोर — ५६०
वेल्हे — ३५५
मुळशी — ५४८
मावळ — ६२०
हवेली — ९०
खेड — ५२८
आंबेगाव — २८४
जुन्नर — २१०
पुरंदर — ४५
एकूण — ३२४०