खंडाळा तालुक्यातील शिरवळ मधील एटीएम सेंटरवर पैशांचा पाऊस; दोन हजार काढल्यावर मिळत होते साडेतीन हजार, पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी
शिरवळ : मकर संक्रांतीच्या सणाला खंडाळा तालुक्यातील शिरवळ मधील नागरिकांना एसबीआय बँकेचा सुपर धमाका अनुभवायास मिळाला. शिरवळ येथे भारतीय स्टेट बँके शेजारीच बँकेचे एटीएम सेंटर आहे. यामध्ये दोन एटीएम मशीन आहेत. परंतु त्यातील एका मशीनवर दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम एटीएम कार्डद्वारे काढल्यास प्रत्यक्षात तीन ते साडेतीन हजार रुपये हातात पडत होते. ही गोष्ट काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी ही चर्चा फोनवरून एकमेकांना सांगितली, आणि बघता बघता ही बातमी संपूर्ण शिरवळ शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एटीएम सेंटर वर पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे जेवढी रक्कम काढली जात होती, तेवढीच रक्कम खात्यावरून कमी होत होती. त्यामुळे ग्राहकांचे काहीच नुकसान होत नव्हते. त्यामुळे लोकांनी पैसे काढण्याचा धडाका सुरूच ठेवला होता. त्यामुळे ज्यांना दहा हजार काढायचे होते. त्यांनी दोन-दोन हजार पाचवेळा काढून अधिकचे पैसे मिळविले. लोकांनी मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी पावल्याचा आनंद घेतला. काही ग्राहकांनी एस बी आय बँकेतील कर्मचाऱ्यांना फोन करून याबाबत कल्पना दिली. परंतु नागरिकांनी मात्र एटीएम मशीन मधील पैसे संपेपर्यंत पैसे काढणे मात्र सुरूच ठेवले.