द बांबू सेतू नांदघूर येथे निवंगणी व जयतपाड शाळेचे वनभोजन
शेतकऱ्यांनी बांबूंची अधिकाधिक लागवड करावी – अनुराधा राहुल काशीद
भोर : कोरडवाहू व डोंगराळ भागात सुद्धा चिकाटीने स्वतःची उपयोगिता सिद्ध करणारे पीक म्हणजे बांबू. बांबूची शेती ही ऊस, कापूस, भुईमूग, तांदूळ यांच्या तुलनेत कमी खर्चिक असते. बांबूमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळी संशोधने सुरू आहेत, बांबूमध्ये हजारो प्रजाती आहेत. शेतकऱ्यांनी बांबूचे अधिकाधिक उत्पन्न घेऊन स्वतःस समृद्ध करावे. असे प्रतिपादन द बांबू सेतूचे अध्यक्षा सौ. अनुराधा राहुल काशीद यांनी केले. निवंगणी व जयतपाड शाळेच्या संयुक्त वनभोजना वेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवंगणी आणि जयतपाड शाळेचे संयुक्त वनभोजन मंगळवारी(दि. १२ मार्च) रोजी आयोजित करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे क्रमिक पाठ्यपुस्तकांबाहेर पर्यावरणात प्रत्यक्ष जाऊन पर्यावरणाचा मानवी सहसंबंध, तसेच पर्यावरणातील अन्नसाखळी, वेगवेगळे पक्षी व प्राणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता यावेत, तसेच मनसोक्त आनंद लुटता यावा, आणि या आनंदाचे तरंग विद्यार्थ्यांच्या देहबोलीवर हिंदोळे घेताना दिसावेत या बहुउद्देशाने वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्ष्यांची किलबिल बाल मनाला आकर्षित करत होती. लालबुड्या, लालगाल्या, शिपाई बुलबुल, भांगपाडी, पळस, गुलाबी मैना, सुभग, गप्पीदास, कोकीळ, कावळा, दयाळ, रॉबिन, होले, चिमणी, वेडा राघू, शिंपी, फुलटोचे, शिंजीर सात भाई पक्ष्यांची जणू शाळाच भरली होती. तांबट पक्षी संपूर्ण परिसर आपल्या ठक ठक आवाजाने अक्षरशा भंडावून सोडत होता, या वनशाळेचा मीच हेडमास्तर आहे, असेच तो जणू आपल्या आवाजातून निसंदिग्धपणे सांगत होता.
तसेच राहुल काशीद सर यांनी यावेळी भविष्यातील करावयाची कामगिरी मेडिटेशन, स्विमिंग पूल, रोपिंग, ट्रेकिंग, नॅचरोपॅथी याबद्दल मार्गदर्शन केले. अनुराधा काशीद मॅडम यांनी बांबूला केलेला कलर कोड, बाळ बांबू, बांबूची पावडर व बाळ कपडे प्रात्यक्षिकासह समजावून दिले. बांबू नर्सरीतील वेगवेगळ्या प्रजाती व बांबूंची नावे, बांबूचे वय, बेटाचे वय विद्यार्थ्यांना सविस्तरपणे गोष्टीच्या माध्यमातून सांगितले. कान गोष्टी, गप्पा, शब्दांच्या भेंड्या, चेंडू खेळ, सायकलिंग आदी विद्यार्थ्यांना आनंद देणारे कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी शाळेच्या स्वयंपाकी व मदतनीस लता शंकर लाळे तसेच ज्योती योगेश ढेणे यांनी दोन्ही शाळेचे वनभोजन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक प्रकाश राजिवडे सर, अशोक चेपटे यांनी उत्तम नियोजन करून आजचे वनभोजन व वनभ्रमंती पूर्णत्वास नेली. नांदघूर शाळेचे मुख्याध्यापक सचिन बारवकर सर यांनी उपस्थिती दर्शवून बांबू विषयी अधिकचे ज्ञान विविध प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी शेवटी जेवणावर मनसोक्त ताव मारला. द बांबू सेतूचे सचिव व संस्थापक राहुल काशीद सर यांनी उपस्थित सर्वांचे मनस्वी आभार मानले.