केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, आचारसंहिता लागू होणार; पण आचारसंहिता म्हणजे काय? त्याचे नियम काय असतात? वाचा सविस्तर
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेते. त्यावेळी या तारखा जाहीर करतानाच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते, ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू च राहते.
कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की पहिला शब्द सतत कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता. कोणत्याही राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या की, त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात येते. या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीच्या उमेदवारांना देखील बंधनकारक असते. चुकून जर कोणत्या उमेदवाराने किंवा पक्षाने या आचारसंहितेचे नियम मोडले तर त्यावर कारवाई केली जाते. परंतु ही आचारसंहिता नेमकी कधी लागू होते? ती किती काळ राहते? या काळामध्ये कोणते नियम पाळावे लागतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मतदान करणाऱ्या नागरिकांनाच माहीत नसतात. त्यामुळेच आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आदर्श आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेत नाही. ही आचारसंहिता सर्व राजकीय पक्षांचे मत आणि तज्ञांचे मत घेऊन लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये वेळोवेळी बदलही करण्यात येत आहे. आचारसंहितेमध्ये राजकीय पक्षांसाठी उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे नियम आखून दिले आहेत. प्रामुख्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी सभा प्रचार निवडणुका, मिरवणुका यांचे नियोजन कसे करावे याबाबतची नियमावली आचारसंहितेत देण्यात आली आहे. तसेच या काळामध्ये कशा पद्धतीने वागायला हवे हे देखील सांगण्यात आले आहे
समाजामध्ये द्वेष पसरवू नये, वाद होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये, जाती आणि समुदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये, हिंसक किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये. एखाद्या पक्षाने किंवा उमेदवाराने आचारसंहितेचे नियम पाळले नाहीत तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कठोर कारवाई करते. यावेळी संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून थांबवले जाते. गरज असल्यास फौजदारी खटलाही दाखल केला जातो. अधिक नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची ही शिक्षा होते.