विजयबाप्पू शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट; पवारांमुळेच भोरचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाला नाही, व्यक्त केली खंत
भोर : बारामती लोकसभेची राज्यभर चर्चा असताना, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत होणार असल्याचे दिसत असतानाच यामध्ये माजी मंत्री विजयबाप्पू शिवतारे यांनी उडी घेतली आहे. बारामती लोकसभे साठी त्यांनी दंड थोपटले असल्याचे दिसत आहे. शिवतारे यांनी आज बुधवारी(दि. २० मार्च) दुपारी १२ वाजता अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार थोपटे उपस्थित नव्हते, परंतु त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज थोपटे उपस्थित होते. “निवडणुका आल्या म्हणून मी अनंतराव थोपटेंना भेटायला आलो नाही तर मी वर्षातून एकदा त्यांना भेटायला येतोच. त्यांना भेटल्यावर एक प्रकारची प्रचंड ऊर्जा मिळते” असे विजय शिवतारे यांनी या भेटेवेळी सांगितले. परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भेटी दरम्यान पुढे अनंतराव थोपटे बोलले की, शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती तरी देखील माझा पराभव झाला. तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांनाच माहीत आहे. तरीदेखील मी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार मला भेटून गेले. मी काही त्यांना बोलावलं नव्हते. त्यावेळी जुन्या आठवणी जागा झाल्या असे सांगत अनंतराव थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शिवतारे यांनी बोलताना सांगितले की, बारामती मतदारसंघात ५ लाख ५० हजार मतदार हे पवारांच्या विरोधातलं आहे. ज्यांना सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना मतदान द्यायचे नाही त्यांनी करायचे काय? त्या लोकांना लोकशाहीतील हक्क बजावण्यासाठी मी बारामती निवडणूक लढवणार आहे. जनतेच्या आग्रहामुळे मला उभं राहावं लागतंय. त्यामुळे मला बंडखोर म्हणू नका. पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळलेत अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केले आहे.
पवारांमुळे भोरचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाला नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी प्रामाणिकपणे सांगितले, माझी पंतप्रधानांवर निष्ठा आहे. युतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे या मताचा मीदेखील आहे. अजित पवार ही जागा जिंकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. मग ती जागा जिंकणारच नसतील तर मी जे पवार कुटुंबाच्या विरोधात जे आहेत त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर का करू नये असा सवाल त्यांनी यावेळी केला.