आरटीओच्या दिवे पासिंग सेंटरच्या भ्रष्ट कारभारावर कारवाई करण्यासाठी युवासेनेचे निवेदन
सासवड : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुरंदर तालुक्यातील दिवे पासिंग सेंटर येथील गैरकारभाराबाबत युवासेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिवे विभागात फिटनेसच्या नावाखाली प्रत्येक पासिंग करीता तीन हजार रूपये व पुणे विभागातून वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड गाडयांचे चालक, मालक यांच्याकडून दरमहा चार हजार रूपये हप्ता वसुली केली जात आहे. पुणे विभागात वाहतूक करणाऱ्या किमान बारा हजार वाहनाद्वारे दरमहा कोटयावधीं रुपयांची लूट होत असल्याची तक्रार युवा सेनेचे पुणे शहराध्य सनी गवते यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी प्रसाद जठार, देविकाताई घोसरे, सागर दळवी, सागर गायकवाड, सोनू पाटील, बाबासाहेब कोरे, डॉ अमोल डुमणे, गिरीश गायकवाड, सौरभ ढेबे, शेहजिनताई सय्यद, जुनेराताई सय्यद, सुभाष जंगम, संतोष मुसळे, प्रथमेश आडकर, कुणाल झेंडे, आकाश दोडमणी, विनायक नाईक, गणेश घोलप, नितीन सुसलादे, अविनाश पाटसकर, आदिनाथ फडतरे, अंकित अहिरे, अभिजीत ढमढेरे, सुमित जाधव, अनिल जाधव, प्रवीण गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सनी गवते म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील दिवे पासिंग सेंटरच्या भ्रष्ट्राचाराबाबत पुण्यातील अनेक संघटना आणि नागरिकांनी युवासेनेकडे तक्रार करत भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले. या सर्व प्रकारास प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधी पाठिशी घालत आहेत असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज युवासेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हा सर्व प्रकार येत्या ४ दिवसात थांबला नाही व त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास युवासेनेच्यावतीने या सर्व पुराव्यानिशी न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. तसेच आचारसंहितेचे पालन करत निवडणुकीनंतर प्रचंड मोठे जनआंदोलन उभारून शिवसेना स्टाईलने हा भ्रष्ट कारभार थांबविण्यात येणार असल्याचे गवते म्हणाले.