शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर बलिदान मास निमित्त सारोळे येथे आयोजित अनिल देवळेकर यांचे शिवव्याख्यान संपन्न
सारोळे : १० मार्च ते ८ एप्रिल २०२४ या दरम्यान सारोळे(ता. भोर) येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सर्व शिवशंभु पाईक संभाजी राजांच्या मृत्यु प्रित्यर्थ ‘धर्मविर बलिदान मास’ पाळतात. संभाजी राजे त्यांच्या कारकीर्दीत २०१ लढाया लढले. यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. शत्रूच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. त्यांचे हे शौर्य अजरामर झाले. या मासामधेच संभाजी महाराजांचे अत्यंत क्रूर पध्दतिने हाल हाल करुन त्यांची फाल्गुन आमावस्येला तुळापुर येथे हत्या करण्यात आली. तेच दुःख त्यांची प्रजा पाळताना पुर्ण मास हे सुतक पाळते.
याच अनुषंगाने हिंदु समाजामधे जागृती व्हावी त्यांच्यापर्यंत संभाजी राजे पोहचावेत, किंबहुना संभाजी राजांमुळेच आज हिंदुस्थानातिल हिंदु समाज शिल्लक आहे. याची जाणीव होण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांचे व्याख्यान आज रविवारी(दि. ७ एप्रिल) श्रीमंत दुर्गामाता चौक(सारोळे, ता. भोर) येथे सायंकाळी ७:०० वाजता आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ह.भ.प अनिल महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून दिली. तसेच धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यकारभार, अर्थकारण, समाज व्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची असणारी मते त्यांनी व्याख्यानातून व्यक्त केली. त्यांचे हे अंगावर शहारे आणणारे शिवव्याख्यान ऐकण्यासाठी सारोळे गावातील तसेच भोर तालुक्यातून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.