भोर तालुक्यातील आळंदे येथे विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या; राजगड पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल
कापूरहोळ: आळंदे(ता. भोर) येथे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गौरी दिपक राजेशिर्के(वय ३१ वर्ष, रा. आळंदे, ता.भोर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती दिपक रामचंद्र राजेशिर्के(रा. आळंदे ता. भोर), सासू प्रतिकला रामचंद्र राजेशिर्के(रा. आळंदे ता. भोर), नणंद कल्याणी राजेंद्र राजेमहाडिक(रा. तारळे ता. पाटण) आणि नणंद उर्मिला उर्फ रसिका योगेश सुर्वे(रा. केडगाव, अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत गौरी यांच्या आई जयश्री मारुती कदम(वय ५५ वर्षे, रा. गोखलेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत गौरी आणि दिपक राजेशिर्के यांचा १४ जुन २०२३ रोजी प्रेमविवाह झाला. यानंतर थोडे महिने व्यवस्थित संसार चालला. त्यानंतर पती दिपक व सासू प्रतिकला हे मयत गौरीचे वारंवार मानसिक व शारीरिक छळ करू लागले. तसेच सन २०२३ दिवाळी मध्ये “तुझा पार्लर चा कोर्स झाला आहे, तर तु तुझ्या घरच्यांकडुन गावामध्ये पार्लरचे दुकान टाकण्यासाठी १ लाख रूपये घेवुन ये” असे म्हणत पती दिपक, सासू प्रतिकला तसेच नणंद कल्याणी व उर्मिला हे चौघे जण मयत गौरी ला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले.
त्यानंतर शुक्रवारी(दि. ५ एप्रिल २०२४) सकाळी ११:१५ वा मयत गौरीने पती दिपक यास सकाळी कामावर जात असताना गार पाण्याची बाटली भरून दिली नाही, या शुल्लक कारणावरून लाथाबुक्यांनी खूप मारहाण केल्याने गौरीने आई जयश्री कदम यांस फोन लावून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर दिपक याने गौरीची बहीण अश्विनीच्या मोबाईलवर फोन करून “आताचे आता तुझे बहीणीला येवून घेऊन जा नाहीतर २० मिनीटामध्ये तिला पुण्यामध्ये घेवुन येवुन फेकुन देतो” अशी धमकी देवून शिवीगाळ केली आणि फोन कट केला. त्यानंतर जयश्री कदम यांनी मुलीची विचारपूस करण्यासाठी दुपारी ४:३० वाजता फोन केला असता गौरीच्या सासरच्या लोकांनी गौरी ही विहीरीत पाय घसरून पडून मयत झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर गौरीच्या माहेरचे नातेवाईक रात्री ९:३० वाजता आळंदे येथे पोहोचले असता. गौरी ही भांडी घासण्यासाठी घराच्या शेजारी असलेल्या विहीरीवर गेली असता पाय घसरून विहिरीत पडून मृत पावल्याचे गौरीचे पती दिपकने गौरीच्या माहेरच्या नातेवाईकांना सांगितले.
परंतु मयत गौरीच्या आई जयश्री कदम यांनी गौरीस वारंवार मारहाण करणे, तसेच मानसिक व शारिरीक छळ करणे व तिला वारंवार पैशाची मागणी करून तिचे जीवन जगण्यास असमर्थ बनवून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती दिपक राजेशिर्के, सासू प्रतिकला राजेशिर्के, नणंद कल्याणी राजेमहाडिक आणि नणंद उर्मिला सुर्वे याच गौरीच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या किकवी पोलीस चौकी येथे फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.