सुप्रिया सुळेंच्या भोंगवलीतील पदयात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सारोळा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सोमवारी(दि. १५ एप्रिल) भोर तालुक्यात विविध ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या दरम्यान भोंगवली(ता. भोर) या गावात या दिवशी सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम थोपटेही सपत्नीक उपस्थित होते. विशेष म्हणजे ही पदयात्रा ६ वाजता आयोजित केली होती. परंतु बाकी सभांना विलंब झाल्यामुळे ही पदयात्रा तब्बल अडीच तास उशिरा म्हणजे ८:३० वाजता सुरू झाली. तरी सुद्धा या गावातील ग्रामस्थांचा या पदयात्रेतील सहभाग पाहण्यासारखा होता. लहान मुले, युवक, महिला, ज्येष्ठ सर्वांनी या पदयात्रेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. डॉल्बी डीजे च्या आवाजात भैरवनाथ मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेची सांगता गणेश मंदिर(सुर्वे आळी) येथे झाली. या वेळी सुप्रिया सुळेंनी भोंगवली गाव हे मला लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीला कायम लीड देत असून यावेळीही देतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने भोंगवली गावातील जयसिंग निगडे, प्रकाश सुर्वे, संदीप निगडे, विठ्ठल सुर्वे, दत्तात्रय कुंभार, विश्वास खुटवड, प्रकाश शेडगे, गिरीष निगडे, शांताराम सुर्वे, दत्तात्रय लंके, जनार्दन भांडे, महादेव शिनगारे, मारुती शेडगे, मयूर निगडे, यश शेटे, संतोष बाठे, शेखर गिरगावकर आणि बहुसंख्येने युवक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.