भोर-कापूरहोळ निसर्गरम्य रस्ता झाला भकास; रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्ग सोडल्यानंतर कापूरव्होळपासून भोर रस्ता लागला की, निसर्गरम्य रस्त्याचे दर्शन व्हायचे. या रस्त्यावरून जाताना हिरवीगार मोठमोठी झाडे रस्त्याच्या शेजारी होती. परंतु या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू केल्याने रस्त्याच्या शेजारील झाडे तोडावी लागली. यामुळे निसर्गरम्य रस्ता उन्हामुळे रणरणता व भकास दिसू लागला आहे.
गेल्या एक वर्षापासून कापूरव्होळ-भोर-वाई या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण काम सुरू असल्याने रस्त्याच्या शेजारील मोठमोठी वृक्ष तोडण्यात आली. यामुळे रस्त्यावरील झाडाची सावली नाहीशी झाली. रस्त्यावर सावली नसल्याने रस्ता उन्हामुळे रखरखता दिसत आहे. रस्त्यावरून प्रवाशांना जाताना उष्णतेच्या झळा अधिक प्रमाणात लागत आहे. यामुळे अधिक उष्णतेमुळे प्रवाशांच्या आजारात वाढ होऊ लागली आहे.
या रस्त्यावरील मोठमोठी झाडे तोडल्याने रस्त्याच्या परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. रस्त्यावरील उष्णतेत अजून भर पडली आहे. या रस्त्यावर वाहन जात असताना वाहनात बिघाड झाला असेल तर काही वेळासाठी रस्त्यावर वाहन थांबवायचे असल्यास झाडाची सावली नसल्याने वाहन थांबवल्यावर अधिक प्रमाणात उष्णतेशी व कडक उन्हाशी सामना करावा लागत आहे.
हा रस्ता पूर्वी निसर्गमय दिसत होता. दरवर्षी या रस्त्याशेजारी दसरा सणाच्या अगोदर पंधरा दिवस झेंडूच्या फुलासारखी विविध जातीची फुले बहरत होती. ही फुले दोन महिने कालावधीकरीता अस्तित्वात असायची. यामुळे हा रस्ता आकर्षणाचा विषय ठरत होता. यादरम्यान या कालावधीत पर्यटकांमध्ये वाढ होत होती. परंतु रस्त्याच्या रुंदीकरणामुळे गेल्या वर्षी दसरा सणाच्या कालावधीत ही फुले नष्ट झाली आहेत.
रस्त्याच्या शेजारी वृक्षलागवडीची गरज
कापूरव्होळपासून भोरपर्यंत या रस्त्याचे काम अंदाजे एक महिन्याच्या आत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा रस्ता पूर्वीप्रमाणे निसर्गरम्य दिसावा यासाठी संबंधित विभागाने या पाऊस काळात लवकरात लवकर रस्त्याच्या शेजारी वृक्ष लागवड करावी, अशी मागणी स्थानिक निसर्गप्रेमी नागरिकांनी केली आहे.