धोकादायक वीज यंत्रणेचे निराकरण आता लगेच होणार, व्हॉट्सॲपद्वारे देता येणार माहिती; महावितरणकडून संपर्क क्रमांक जाहीर

पुणे : पावसाळ्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती व्हॉट्सॲपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे मंडलअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह हवेली, मुळशी, वेल्हा, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३, बारामती मंडलअंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉट्सॲप क्रमांक महावितरणने उपलब्ध करून दिला आहे.

या व्हॉट्सॲप क्रमांकावर वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती/तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्सॲपद्वारे माहिती द्यावी. ज्या नागरिकांकडे व्हॉट्सॲप नाही, त्यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित मोबाइल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Advertisement

पोस्टर्स, पत्रके चिकटवू नयेत
रोहित्र, फिडर पिलर, वीजखांब आदींवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, पत्रके चिटकवू नयेत. पोस्टर्स किंवा पत्रके चिकटवताना विद्युत अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून कोणत्याही प्रकारची पत्रके किंवा पोस्टर्स वीजयंत्रणेवर लावू नयेत किंवा चिकटवू नयेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

”व्हॉट्सॲपवर फोटोसह प्राप्त झालेली माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहे. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्याला व्हॉट्सॲपद्वारेच दुरुस्तीनंतरचा फोटो पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे.”
      -अंकुश नाळे, प्रादेशिक संचालक, महावितरण पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page