भोर तालुक्यातील वागजवाडी येथील ज्येष्ठाचा इंग्लंडमध्ये हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू
किकवी : भोर तालुक्यातील वागजवाडी येथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा इंग्लंड मधील मॅंचेस्टर शहरात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी(दि. १३ जुलै) सायंकाळी ६ वाजता घडली. सोपानराव लक्ष्मण मोरे(वय ६८ वर्ष) असे या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे.
सुनेच्या बाळंतपणासाठी मोरे दाम्पत्य इंग्लंडमध्ये
सोपानराव मोरे यांचा मुलगा अभिजीत हा आय टी इंजिनीयर असून तो पत्नीसह इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात वास्तव्यास आहे. अभिजीत यांच्या पत्नीची ऑगस्ट महिन्यात प्रसूतीची तारीख असल्याने सुनेची देखभाल करण्यासाठी मोरे दाम्पत्य जून महिन्यात इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. परंतु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी सायंकाळी त्यांचे आकस्मित निधन झाले.
भारतीय हवाईदल व महाराष्ट्र शासनाच्या सांकेतिक विभागात केली होती नोकरी
सोपानराव मोरे यांनी भारतीय हवाई दलात उच्च पदावर काम केले होते. हवाई दलात रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांकेतिक विभागात देखील नोकरी केली. वयाच्या ६० वर्षापर्यंत ते सांकेतिक विभागात नोकरीस होते. रिटायर्ड झाल्यानंतर ते भोर तालुक्यातील वागजवाडी या त्यांच्या मूळ गावी वास्तव्यास होते.
गावाच्या समाजकार्यात मोठा सहभाग
सोपानराव मोरे हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांना अध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची ओढ होती. तसेच वागाजवडी या त्यांच्या मूळ गावात बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धारात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या मृत्यूने मोरे कुटुंबियांवर तसेच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात बायको, एक मुलगा, एक मुलगी, सून, आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.