भोरच्या ब्रिटीशकालीन पुलाला झाड-वेलींचा विळखा
भोर : भोर शहराला जोडला जाणाऱ्या ब्रिटिशकालीन राणी लक्ष्मीबाई पुलाला दोन्ही बाजूने झाड-वेलींनी विळखा मारला असल्यामुळे पुल धोक्याची घंटा मोजत आहे. परिणामी पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने पुलावरील झाडे, वेली हटवण्याची मागणी नागरिक तसेच वाहनचालकांनी केली आहे.
भोर शहराच्या ऐतिहासिक सौंदर्यामध्ये भर टाकणाऱ्या राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशकालीन पुलाचा पुणे, महाड, शिरवळ येथे ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुलावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असतानाही पुलाच्या दोन्ही दगडी रेखीव बांधकामातून झाड-वेली यांची उगवण होऊन मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुल वाहतूकीसाठी सुरुळीत दिसत असला तरी पुलाच्या बांधकामात वेली, झाडांच्या मुळ्यांमुळे धोक्याचा ठरत आहे. या पुलावरील झाडे संबधित विभागाने वेळीत काढून टाकावी अन्यथा भविष्यात पुलाला झाडांच्या मुळ्यामुळे भेगा पडून पुलाची कधीही पडझड होऊ शकते. सध्या कापुरव्होळ-भोर मांढरदेवी, सुरुर फाट्यापर्यंत नव्याने रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम सुरू असून जवळ-जवळ ७० टक्के काम पूर्ण होत आले आहे. परंतु या मार्गावर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर मार्गावरील पुल अरुंद असल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना नाहक ञास सहन करावा लागत आहे. यामुळे या मार्गावरील सर्व पुल नव्याने तयार करुन रुंद करावे अशी मागणी होत आहे. तसेच ब्रिटिश कालीन असलेल्या पुलावर पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग नसल्यामुळे पाणी पुलावर साचुन राहून वाहने नादुरुस्त होत आहेत. तरी पावसाच्या पाण्याचा निचरा चांगल्या पध्दतीने करावा. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होत आहे.