विकासाला विरोधकांचा खो; बिनबुडाचे व खोडसाळ आरोप करून दिशाभूल – संगमनेर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांसह पाच सदस्यांचा एकमुखी दावा
भोर : मागील काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील भाटघर धरणा शेजारी असलेल्या संगमनेर-माळवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्य पैकी पाच सदस्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिले होते. ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी इतर सदस्यांना विचारात न घेता काम करत असल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या सदस्यांनी केला होता. परंतु मतदारांचा आदर राखत सरपंच सायली महेंद्र साळुंके यांच्या कामावर विश्वास दाखवत मासिक सभेच्या बैठकीत या पाच सदस्यांपैकी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार यांनी राजीनामा माघारी घेतला आहे. यामुळे नऊ पैकी पाच सदस्य संख्या झाल्यामुळे सरपंच व उपसरपंच गटाला बहुमत सिद्ध झाले आहे. यामध्ये सरपंच सायली महेंद्र साळुंके, उपसरपंच प्रमोद दशरथ बांदल, सदस्य शर्मिला संतोष लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य लता सुरेश खामकर, आणि अनिल भगवान पवार यांचा समावेश आहे.
या आरोपांचा समाचार घेताना सरपंच म्हणाल्या की, संगमनेर-माळवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व खोडसाळ असून ग्रामस्थांची दिशाभूल करणारे आहेत. गावामध्ये सुरू असणारा विकास कामांचा प्रभाव काही सदस्यांसाठी राजकीय दृष्ट्या धोकादायक असल्याच्या कारणास्तव नैराश्यातून ते नाहक चिखलफेक करत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेले आठ महिने कोणत्याही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेस हे राजीनामा दिलेले सदस्य उपस्थित नव्हते. विकासाच्या आड येत सरपंच आणि उपसरपंच पदाच्या लालसेपोटी हा सर्व प्रकार घडल्याचा उघडकीस आला आहे. यामुळे गावाच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याच्या आधीच ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार यांनी प्रसंगावधान राखत विकासाच्या भूमिकेतून ग्रामस्थांच्या आणि विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्या पाठीशी राहून भूमिका जाहीर केल्याने या गटाला बहुमत सिद्ध झाले आहे.
“गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत गावात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक विकास कामे मार्गी लावली. एक महिला आणि गावची प्रथम नागरीक म्हणून भूमिका बजावत असताना नाहक आरोप आणि विकास कामांच्या आड येण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. परंतु उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्यामुळेच मी यापुढील काळात देखील विकास कामे अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे.”
– सायली महेंद्र साळुंके(विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत संगमनेर-माळवाडी).
“ग्रामपंचायतीचा कोरम पूर्ण असेल तर प्रशासक लागणार नाही व रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवला जाईल. यानंतर जिल्हाधिकारी पोटनिवडणुकी संदर्भात निर्णय घेतील.”
– किरणकुमार धनावडे(गटविकास अधिकारी, भोर).