“राजा रघुनाथराव विद्यालय” जिल्ह्यात प्रथम; “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियाना अंतर्गत ११ लाख रुपयांचे बक्षीस
भोर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात माध्यमिक विभाग खाजगी शाळांमधून भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून ११ लाख रुपये बक्षीस मिळविले आहे.
या विद्यालयाची स्थापना १८९७ ची आहे. राजा रघुनाथराव विद्यालयाने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक नामांकित दर्जेदार व गुणवंत विद्यार्थी घडविणारे विद्यालय अशी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यालयात संस्थेच्या माध्यमातून व शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.
यावर्षी २०२४-२५ मध्ये ऑगस्ट महिन्यापासून शासनाच्या परिपत्रकांनुसार हा उपक्रम सुरू झाला. तालुका स्तरावर पहिल्यांदा या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला व शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली. जिल्हास्तरावर घवघवीत यश मिळावे यासाठी ज्या उणिवा व कमतरता राहिल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेशराजे पंतसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या नियामक मंडळाचे विद्यमान चेअरमन प्रमोद गुजर, व्हॉइस चेअरमन सुरेश देवी, सचिव प्रकाश गोर, ज्येष्ठ संचालक सुरेशभाई शाह, डॉ. सुरेश गोरेगावकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांच्या सहकार्याने प्रयत्नातून राहिलेल्या भौतिक सुविधा युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आल्या. त्यासाठी उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अहोरात्र प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यासाठी करावयाची तयारी वर्ग सजावट परिसर स्वच्छता परसबाग वेगवेगळे फ्लेक्स महावाचन प्रकल्प प्रयोगशाळेतील साहित्याची आकर्षक मांडणी त्यासाठी करावयाच्या फाइल्स व्यवस्थित तयार केल्या गेल्या. यासाठी सर्वांनी आपआपल्या पातळीवर योग्य पद्धतीने योगदान दिले.
९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. पाच ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. या वर्षी दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे एक कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे सहा लाख ६० हजार शिक्षक या उपक्रमांत सहभागी झाले होते.
“या उपक्रमासाठी संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक ताकवले एम.एस., वीर ए.एस., जाधव एस.व्ही., डेरे एस.के., सापे बी. वाय., भागवत.एम.एस., या सर्वांनी व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली व या स्पर्धेत विद्यालयास प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल मी मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो.”
– लक्ष्मण मारुती भांगे(मुख्याध्यापक,राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर)