सख्ख्या नातीनेच केले आज्जी चे दागिने लंपास…
अल्पवयीन नातीचा अजब कारनामा…

पाचगणी : कासवंड(ता.महाबळेश्वर) येथील वयोवृद्ध दाम्पत्य आनंदा दगडु पवार यांच्या राहत्या घराचा बंद दरवाजा तेथेच ठेवलेल्या चावीने उघडुन अज्ञात व्यक्तीने तीन तोळे वजनाची चैन, तीन तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र, चांदीच्या पट्ट्या व कर्णफुले चोरून नेले होते. दि.३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेचा पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादी वयोवृद्ध असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने पाचगणी पोलिसांना सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेचच महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस अंमलदार रवींद्र कदम, तानाजी शिंदे,उमेश लोखंडे यांचे पथक तयार करून श्वान पथक व ठसे तज्ञ यांना घटना स्थळी पाठवले. माहितीच्या माणसाने ही चोरी केलेली असावी असा अंदाज पोलिसांना आला. त्यावरून पोलीसांनी तपासाची दिशा फिर्यादीच्या कुटुंबाकडे वळवली.
तपास करत असताना घरातील दागिने फिर्यादीच्या अल्पवयीन नातीने चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी चोरी केल्याचे समोर आले. चोरीचे दागिने तिने तिचा अल्पवयीन मित्र व त्याची आई सुनंदा तुकाराम बनसोडे (वय ३८ रा. गोखलेनगर , जानवडी , सोमेश्वर मंदिर पुणे) हिच्या मदतीने गोखलेनगर येथील सोनारास विकले. आणि त्यातून आलेल्या पैशातून एका महागड्या कंपनीचा मोबाईल आणि एक स्कूटी मोटार सायकल बुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सर्वांना ताब्यात घेऊन घरफोडी करून चोरी केलेला १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पाचगणी पोलिसांनी अतिशय जलद तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. याबाबत परिसरातील सर्वांनी त्यांचे आभार मानले
ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वाई उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे ,पोलीस अंमलदार रवींद्र कदम, तानाजी शिंदे ,उमेश लोखंडे पाचगणी पोलीस ठाणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page