अंबाडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून वर्गमित्राच्या कुटुंबीयांना दिली मदत…
भोर प्रतिनिधी : तुषार सणस
भोर : आज दिनांक ७ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबाडे येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून सुचलेल्या व मोठ्यांना देखील हेवा वाटावा असा उपक्रम मुलांनी राबविण्याचे ठरविले.आपले विचार मुलांनी शिक्षकांकडे व्यक्त केले आणि शिक्षकांनी देखील प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. कारण होते ते गेल्या दहा दिवसापूर्वी भोर आंबाडे रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये त्यांचा वर्गमित्र आदित्य हनुमंत उल्हाळकर याच्या वडिलांना जबर दुखापत झाली.
घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मोठे संकट त्यांच्या कुटुंबीयांवर आले. दवाखान्यात लाखो रुपये खर्च आला.आमच्या मित्रावर आलेल्या संकटात त्यांच्या कुटुंबीयांना थोडी मदत आपणाकडून व्हावी म्हणून .”एक हात मदतीचा माझ्या मित्राच्या कुटुंबीयांना” या विचाराने संपूर्ण गावात घरोघरी जाऊन जमेल तेवढी मदत गोळा करून आदित्य उल्हाळकर याच्या कुटुंबीयांना देण्यासाठी दोन दिवस शाळेतील सर्व मुले गावांमध्ये निधी गोळा करण्यासाठी फिरली सर्व शिक्षकांनी देखील यास सहकार्य केले.माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र चौघुले यांच्या कडून निधी घेत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.दोन दिवसामध्ये ८००० एवढा निधी गोळा करण्यात आला. यामधून घरगुती किराणा , गृहउपयोगी वस्तू व शालेय गणवेश मिळून ५७००रूपये चे साहित्य व रोख २३००रूपये असे त्यांचे कुटुंबीयांना देण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य माधूरी खोपडे मुख्याध्यापक राजू कारभळ, शिक्षक शरद पवार, उज्ज्वला भारती,मोहिनी गायकवाड विद्यार्थी उपस्थित होते.