पोलिसांनी जलदगतीने केलेल्या तपासामुळे मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच खुनाचा उलगडा

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण, मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच पुणे ग्रामीण पोलिसांनी खुनाचा उलगडा केल्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

न्हावरा-केडगाव रस्त्यावरील पारगाव पुलाखाली भिमा नदीपात्रात हा मृतदेह मिळून आला होता. पथकाने सलग आठ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एक संशयित चारचाकी पिकअप वाहन निदर्शनास आले.

पिकअप वाहन हे सुपा टोलनाका बाजूकडे गेल्याचे आढळून आल्याने सुपा टोलनाका परिसरात चौकशी केली असता मृत व्यक्ती टोलनाक्याजवळील हॉटेल सौंदर्या इन येथे कामास असल्याची माहिती मिळाली. हॉटेल सौंदर्या इन हे चापू भिमाजी तरटे (वय ३६ रा. पळवे खु, ता. पारनेर जि अहमदनगर) व निलेश माणिक बोरात (वय २६, रा. मुंगशी, ता. पारनेर जि. अहमदनगर) यांनी चालविण्यासाठी घेतलेले असून, याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबुल केले.

Advertisement

मयत संतोष आप्पासाहेच गाडेकर (रा. टोकवाडी ता. मंठा जि. जालना) असल्याची माहिती मिळाली. संतोष गाडेकर याने हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतलेली होती, परंतु तो काम करत नसल्याने त्याचा खून करून पिकअप वाहनातून पारगाव पुलावरून भिमा नदीपात्रात टाकून देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे चापू तरटे व निलेश बोरात या दोन्ही आरोपींना पिकअप वाहनासह शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, राजु मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page