शिरूरला घरात चालायचा बनावट नोटांचा छापखाना; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी उघड केलं रॅकेट
रांजणगाव : शिरुर येथून एक व्यक्ती भारतीय बनावट चलनी नोटा कारेगाव येथे दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास वितरित करण्यासाठी घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली असुन मनिष अमर पाल (वय २४ वर्षे रा. रेवाना.जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश) याच्याविरुध्द रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा लावून मनीष पाल यांस पाठलाग करुन त्याला पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपयाच्या ६० नोटा अशा एकूण ३० हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा मिळुन आल्या.
त्यानंतर त्या व्यक्तीस सदरच्या नोटा कोठुन आणल्या याबाबत विचारणा केली असता त्याने सदरच्या नोटा या शिरूर, रामलिंग रोड येथील राहत्या घरात बनवल्या असल्याचे सांगितले. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या राहत्या खोलीमध्ये जावुन पाहिले असता त्या ठिकाणी भारतीय बनावटीच्या बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठीचे साहित्य त्यामध्ये नोटा तयार करण्यासाठीचे पांढरे कागद, कलर प्रिंटर स्कॅनर, हिरव्या रंगाची पावडर, छाप्याची लाकडी फ्रेम, वेगवेगळ्या रंगाचे कलर स्प्रे, इत्यादी साहित्य मिळुन आले.
सदरची कामगीरी रांजणगाव एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, अभिमान कोळेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करीत आहेत.