फलटण येथील मंडलाधिकारी आणि तलाठी एकाचवेळी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
फलटण : वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी फलटण सजाचे लोकसेवक तलाठी श्रीमती रोमा यशवंत कदम (रा. मलठण, ता. फलटण) आणि लोकसेवक सर्कल जितेंद्र बाळासाहेब कोंडके (रा.पुजारी कॉलनी, फलटण) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे १३ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या घटनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र झाले असून त्याप्रमाणे सातबारा उतार्यावर त्याची नोंद करण्यासाठी तलाठी कदम यांनी स्वत:साठी ३ हजार रूपये व सर्कल कोंडके यांच्यासाठी १० हजार रूपये अशी एकूण १३ हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. सर्कल कोंडके व तलाठी कदम यांचे कार्यालय फलटण चावडी येथील एकाच इमारतीत असून सर्कल कोंडके यांनी सदर लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम स्वत: त्यांचे सर्कल कार्यालय, फलटण येथे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सापळा रचून रंगेहाथ पकडले असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस अंमलदार, नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश येवले, शीतल सपकाळ यांनी केली.