भोर – सोयाबीन भरडताना मळणी यंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा जागीच मृत्यू
खेड शिवापूर : भोर तालुक्यातील कुसगाव, गोरेवस्ती येथील एका महिलेचा मळणी यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी(दि. २३ ऑक्टोबर) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. रंजना दत्तात्रय गोरे(वय ३५ वर्ष) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसगाव, गोरेवस्ती(ता. भोर) येथील रंजना गोरे या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घरासमोर मळणी यंत्रात सोयाबीन भरडत होत्या. त्यावेळी सोयाबीन भरडत असताना मशीनच्या पट्टयामध्ये रंजना गोरे यांचा साडीचा पदर अडकला. यावेळी साडीसह मशीनमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. उपस्थित व्यक्तींनी त्यांना त्वरित उपचारासाठी खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांस मयत घोषीत केले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सागर गायकवाड करीत आहेत.