धक्कादायक! नसरापूर येथे भरदिवसा घरफोडी करून तब्बल सव्वासात लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी; परिसरात भीतीचे वातावरण
नसरापूर : दिवसाढवळ्या सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल ७ लाख ३४ हजार ३०० रुपयांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना नसरापूर(ता. भोर) येथे घडली आहे. भरदिवसा ही घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत खंडु सिताराम मोहीते(वय ५३ वर्ष, रा. धायरेश्वर सोसायटी नसरापुर, ता.भोर. मुळ रा. वाठार निंबाळकर, ता.फलटण) यांनी रविवारी(दि. २१ जुलै) राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खंडु मोहिते हे नसरापूर(ता. भोर) येथील धायरेश्वर सोसायटी सी विंग मधील पहील्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०३ मध्ये कुटुंबासह राहतात. फिर्यादी मोहिते हे वेळू(ता. भोर) येथे नोकरीस असून ते नेहमी प्रमाणे रविवारी सकाळी ७ वाजता कामावर निघून गेले. त्यांनतर मोहिते यांच्या पत्नी दुपारी १ वाजता त्यांच्या २ मुलांसहित सुट्टी असल्याने फ्लॅट ला कुलूप लावून माहेरी भोलावडे(ता.भोर) येथे निघून गेल्या. दरम्यान सायंकाळी ६ वाजता त्या घरी परतल्या असता, त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केला असता त्यांना लोखंडी कपाटातील साहित्य फ्लॅटमध्ये अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तर सोन्याचे दागिने ठेवलेले बॉक्स जमिनीवर मोकळे पडले होते. त्यांनी लगेचच त्यांचे पती फिर्यादी मोहिते यांना फोन करून हा घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.
मोहिते यांनी लगेचच घराकडे धाव घेत या घटनेची माहिती राजगड पोलिसांना दिली. या चोरी मध्ये घरात ठेवण्यात आलेल्या सोन्याचे मोठे गंठण, मंगळसुत्र, नेकलेस, कानातील वेल, झुमके, चैन, अंगठ्या, कानातील बाळया तसेच चांदीचा कंबरेचा नेखला अशा तब्बल ७ लाख ३४ हजार ३०० रुपयांच्या किंमतीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. तर भरदिवसा चोरी झाल्याने नसरापूर परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेबाबत मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.