शेअर मार्केटच्या बहाण्याने भोर तालुक्यातील कांजळे गावातील शेतकऱ्याची फसवणूक; राजगड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

नसरापूर : शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याला १ लाख २ हजार ८०० रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शेतकरी अनिल रामचंद्र तांबट(वय ४२ वर्ष, रा. कांजळे ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी अंकुश भोरडे(रा. वरवे खुर्द, ता. भोर) आणि अमोल जालींदर महाडीक(रा. शिंदवणे, ता. हवेली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल तांबट भोर तालुक्यातील कांजळे गावचे रहिवासी असून शेती करतात. संशयित आरोपी शिवाजी भोरडे यांनी शेतकरी तांबट यांना शेअर मार्केटचे आमिष दाखवत सांगितले की, त्याचे दाजी अमोल महाडीक हे शेअर मार्केटमधून लोकांना चांगले पैसे कमवून देतात. तुम्ही त्यांच्या बँक खात्यावर पैसे भरा तुम्हाला दर दिवशी दिड ते दोन हजार रूपये मिळतील. तुम्हाला शेती करण्याची काहीच गरज पडणार नाही.

Advertisement

यांनतर शेतकरी तांबट यांनी अमिषाला बळी पडत अमोल महाडीक यांच्या हडपसर शाखेतील एका बँकेत वेळोवेळी एकूण १ लाख २ हजार ८०० रुपये भरले. परंतु त्यांना कोणताच परतावा  मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी राजगड पोलीस ठाण्याकडे धाव घेत या घटनेबाबत बुधवारी(दि. ८ ऑगस्ट) तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून राजगड पोलीस ठाण्यात वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page